Sunday, August 7, 2016

कलाकार

पाऊस आणि कलाकार किती सारखे असतात ना... दोघेही मनस्वी, लहरी, थोडेसे आत्मकेंद्री, तरीही हवेहवेसे. बाकीचे सारे विश्व, अगदी सूर्य चंद्रसुद्धा काळ काम वेगाच्या गणितात गुरफटलेले, पण ह्याना मात्र स्थलकालाचे बंधन नाही. अर्थात दैवी स्रुजनाचा स्पर्श झाल्यावर ह्या चौकटीत कसं बसणार!!
मैफल रंगवण्याची दोघांचीही ताकद असामान्य. संथ ठायीत आकाशात विहरणारे गंभीर गर्द जांभळे मेघ एकाएकी मध्यलयीत बरसू लागतात. लय वाढत जाते तशी मैफिल अधिक गूढ गहिरी होत जाते. अचानक एखादा आर्त सूर विजेसारखा लखकन काळीज उजळून जातो. आधी सौम्य म्रुदू भासणारया सरी अाता अधिकाधिक द्रुत, प्रवाही होत जातात आणि त्या सरीत सारे चिंब भिजून जातात. सगळे सचैल झाल्यावर हे नाट्य थोडावेळ शांत होते.
ह्या उन्मनी अवस्थेत एखादी नाजुक हळवी सर ठुमरीसारखी बरसून जाते आणि सगळे मुग्ध उत्फुल्ल होतात. अवचित आलेली ही सर आणि ठुमरी ह्यांमधे कुणाचा श्रुंगार जास्त लोभस हे कसं ठरवायचं??

मैफिलीचा उत्तररंग सुरू होतो. अखेर श्रावणसरी भैरवी गातात आणि मैफल सरते. शिल्लक राहते एक त्रुप्ती, समाधान आणि पुनरुक्तीची हुरहुर......

अर्थात मैफल रंगण्यासाठी फक्त पाऊस किंवा कलाकार पुरेसा नाही. सरीसाठी आसुसलेली भुई आणि सुरासाठी आसुसलेला रसिक ह्यांची तगमगही तीव्र हवी आणि पहिल्या थेंबाने किंवा षड्जाने मोहरलेली दादही म्रुद्गंधी हवी.

अखेर पावसाचा प्रवास भुईपाशी संपतो आणि कलाकाराचा रसिकापाशी. कारण त्याची उत्कटता, आवेग, उत्स्फुर्तता, संदिग्धता आणि सर्जनशीलता समजेल, रुजवेल आणि फुलवेल अशा ताकदीची जमीन किंवा रसिक लाभला तरच हा स्रुजनसोहळा उत्कर्षबिंदूला जाऊन पोचताे, कलावंत आणि रसिक, दोघांसाठीही...

No comments:

Post a Comment

Disqus Shortname

Comments system